माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी १५ ऑक्टोबर हा कलाम यांचा जन्मदिन राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम आत्मविश्वास असणारे कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विविध पैलू होते. नितळ मनाचे स्वभाव वैशिष्ट्य असणारे कलाम यांच्यामध्ये मनाचा दिलदारपणा होता. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा आत्मविश्वास त्यांनी प्रत्येक भारतवासियांच्या मनात निर्माण केला होता. कलाम यांचे लेखन स्फुर्तिदायी होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून आयोजित केला जाईल, असे तावडे यांनी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले.
No comments:
Post a Comment